citynewsFarmersCrisisJalna

धावड्यात सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची पीक पाहणी

पावसाअभावी कोमेजत असलेल्या पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी

जालना : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भोकरदन-जाफराबाद उपविभागीय अधिकारी कार्तिक पाणिग्रही यांनी क्षेत्रभेट दिली. पावसाअभावी कोमेजत असलेल्या पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या.

१६ सप्टेंबर रोजी कार्तिक पाणिग्रही यांनी धावडा गावाला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत महसूलविषयक समस्या तसेच पीक पाहणीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी कोमेजत असलेल्या विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली.

क्षेत्रभेटीदरम्यान धावडा-विझोरा पानंद रस्ता, पाझर तलावाची तुटलेली भिंत, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेले जलकुंभाचे काम तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांना आवश्यक सूचना करून समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

याशिवाय, पुढील महिन्यात जिल्हाधिकारी अश्मिता मित्तल यांच्या धावडा मुक्कामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली.

प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची परिस्थिती आणि स्थानिक समस्या जाणून घेतल्याने या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. आता पाहणीदरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांवर संबंधित विभागांकडून कितपत कार्यवाही होते, याकडे धावडा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button