AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationLatest NewsMaharashtra

राजापेठ–आंबापेठ मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था; साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

गणेशोत्सवाच्या काळात वाढली वर्दळ; रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ ते आंबापेठ मार्गाची सध्या खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असताना रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.राजापेठ येथून आंबापेठकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, एकवीरा देवी, अंबादेवी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि गांधी चौकाकडे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. मात्र सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात या मार्गावरील गर्दी वाढल्याने नागरिकांच्या समस्या आणखी गंभीर झाल्या आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अमरावती दौऱ्यावर आले असताना चंदू कलोती यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी हा रस्ता तातडीने तयार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अनेक वर्षे उलटूनही रस्त्याच्या सद्यस्थितीकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button