citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू!

सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; वनविभागाची गस्त वाढवली

रामटेक | प्रतिनिधी

देवलापार वनपरिक्षेत्रातील सीतापार बिटात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बापुराव कृष्णा ढोबळे, रा. लोधा, असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंडकापार उपवनक्षेत्रातील सीतापार बिटाच्या कक्ष क्रमांक ४६५ आरएफ मधील चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते. याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. यावेळी ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविला आहे.

या घटनेनंतर सीतापार आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

घटना नेमकी वाघाच्या हल्ल्यामुळेच घडली का, याबाबतचा अधिकृत निष्कर्ष पुढील तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button