पोल्ट्री फार्मचे कुलूप तोडून कोंबड्या चोरणारे दोघे अटकेत!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, २०१४ पासून फरार आरोपीही ताब्यात
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोल्ट्री फार्मचे कुलूप तोडून कोंबड्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ४९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच कारवाईत नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील २०१४ पासून फरार असलेल्या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या चोरीचा छडा
१० सप्टेंबर २०२६ रोजी मोर्शी पोलीस ठाण्यात अशोक फकिरजी चौधरी, रा. दापोरी यांच्या तक्रारीवरून पोल्ट्री फार्ममधून कोंबड्या चोरी केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणकडून सुरू होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी दोन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्याम वासुदेवराव सुरजुसे, वय ५५ वर्षे, रा. सुकळी, ता. वरूड आणि मुकेश दिवाकर धुर्वे, वय २४ वर्षे, रा. कारली, ता. वरूड यांचा समावेश आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून ९ हजार १०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ४९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील बिजय ज्ञानेश्वर उईके, रा. सुरळी, ता. वरूड हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
२०१४ पासून फरार आरोपीला अखेर पकडले
स्थानिक गुन्हे शाखेने नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील तब्बल २०१४ सालापासून फरार असलेल्या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
१४ जानेवारी २०१४ रोजी शंकर मिठुजी तिरमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाढोणा रोडवरील तिरमारे बार अँड रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या सुमारास चार जणांनी प्रवेश करून मारहाण आणि लुटमार केल्याचा आरोप होता. या घटनेत बारमधील १५ ते २० रमच्या बाटल्या, सुमारे १८ ते १९ हजार रुपये रोख आणि कामगारांचे तीन मोबाईल घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी दिपक रतन पवार, वय ३५ वर्षे, रा. शिवाजी नगर, चांदूर रेल्वे हा २०१४ पासून फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयीन अटक वॉरंट तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली होती.
अखेर १५ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिपक रतन पवार याला चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकातील अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.



