अजनीत देहव्यवसाय प्रकरणात तरुण ताब्यात!

महिलांना पैसे कमावण्याचे आमिष दाखवून प्रवृत्त केल्याचा आरोप; एमडी ड्रग्जसह १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाने मोठी कारवाई केली आहे. देहव्यवसायासाठी महिला उपलब्ध करून दिल्याच्या आरोपातून एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एमडी ड्रग्जसह एकूण १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी हनुमान नगर सार्वजनिक ग्रंथालयासमोरील रस्त्यावर सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाने ही कारवाई केली. मंथन गोपाल थोटे हा महिलांना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच आणि बोगस ग्राहकाच्या माध्यमातून कारवाई केली. या कारवाईदरम्यान एका सज्ञान महिलेला बोगस ग्राहकासोबत पाठविल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यानंतर संशयित मंथन गोपाल थोटे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ३.६१० ग्रॅम एमडी पावडर मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३६ हजार १०० रुपये किमतीचे एमडी, १ हजार ५०० रुपये रोख, ६० हजार रुपये किमतीची ॲक्टिवा आणि २१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या कारवाईनंतर मंथन थोटे याला अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या प्रकरणातील कुणाल यशवंत येळेकर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा आणि NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास अजनी पोलीस करत आहेत.



