मानकापूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची मोठी कारवाई!

दोन पान टपऱ्यांवर छापा; ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात प्रतिबंधित गुटख्याची चोरटी विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पान टपऱ्यांवर छापा टाकून ६२ हजार २१० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, खर्रा मशीन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार, १५ सप्टेंबरच्या रात्री पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे पथकासह शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकरा रोडवरील गोधणी रेल्वे पुलाजवळ गोलु पान सेंटर आणि कान्हा पान पॅलेस येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्याची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री केल्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्तीवरील अधिकाऱ्यांना पंचांसह घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी गोलु पान सेंटरवर कारवाई केली असता दुर्गादास नारायणदास मलवे हा आढळून आला. तर पान टपरीचा मूळ मालक प्रफुल बाबारावजी भिष्णुकर पोलिसांना पाहून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरीकडे कान्हा पान पॅलेस येथे योगेश ज्ञानेश्वर बोंदरे आढळून आला. दोन्ही पान टपऱ्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता विमल पान मसाला, राजश्री, रजनीगंधा यासह प्रतिबंधित गुटखा, दोन खर्रा मशीन आणि रोख रक्कम असा एकूण ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दुर्गादास मलवे, प्रफुल भिष्णुकर आणि योगेश बोंदरे या तिघांविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करत आहेत.



