सिटी न्यूज कार्यालयात गणरायाची भव्य महाआरती!

अमरावती शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील सिटी न्यूज कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी सायंकाळी ७ वाजता गणपती बाप्पाची भव्य महाआरती संपन्न झाली.
या महाआरतीला अमरावती शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच अमरावती महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी विशेष उपस्थित होते. मान्यवरांनी सिटी न्यूज कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेत बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.

महाआरतीला डीसीपी यशवंत सोलंके, डीसीपी शाम घुगे आणि डीसीपी प्रांजली सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. यांच्यासोबत एसीपी दिलीप वडगावकर, वाहतूक पोलीस निरीक्षक गावंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे, राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दातालकर यांनीही महाआरतीमध्ये सहभाग घेतला.
यावेळी अमरावती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि उपायुक्त नरेंद्र वानखडे हेदेखील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेत महाआरतीमध्ये सहभाग नोंदवला.
महाआरतीच्या वेळी सिटी न्यूज कार्यालयात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित मान्यवर आणि सिटी न्यूज परिवारातील सदस्यांनी भक्तिभावाने आरतीमध्ये सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर सिटी न्यूज कार्यालयातील गणरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक, प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रातील स्नेहाचे वातावरणही या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.
महाआरतीनंतर सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक डॉ. चंदु सोजतिया यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सिटी न्यूज कार्यालयातील गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला असून, गणरायाचा उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात सुरू आहे.




