citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrime

नागपुरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; डोडा पावडरसह दोघे जेरबंद, 73 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत डोडा पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या या कारवाईत डोडा पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 73 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने कपीलनगर परिसरातील नारी रोड येथे सापळा रचला. कारवाईदरम्यान यश नितीन वालदे (वय 23) याला संशयित हालचाली करताना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

एनडीपीएस कायद्यातील सर्व नियमांचे पालन करून पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली 249 ग्रॅम डोडा पावडर जप्त करण्यात आली.

पुढील चौकशीत यश वालदे याने ही डोडा पावडर चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चंदन साखरे यालाही ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 15(अ) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कपीलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमुळे नागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button