citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrime

कळमना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 12 तासांत घरफोडीचा छडा, 6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तब्बल 11 लाखांहून अधिक रुपयांचा माल चोरीला गेलेल्या प्रकरणात पोलिसांनी जलद तपास करत 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दालमील रोड परिसरात असलेल्या राहुल सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड या गोदामात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. फिर्यादी राहुल जयचंद बत्रा यांच्या मालकीच्या गोदामाच्या छतावरील टिन उचलून आरोपींनी आत प्रवेश केला आणि टाईल्स, सॅनेटरी साहित्य तसेच सीपी फिटिंगसह एकूण 11 लाख 39 हजार 710 रुपयांचा माल लंपास केला.

या प्रकरणी कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान परिसरातील 20 ते 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तसेच स्थानिक बातमीदार आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयितांची माहिती गोळा करण्यात आली.

तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्त माहितीचा प्रभावी वापर करत पोलिसांनी संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि सापळा रचून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी चोरीतील 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे कळमना पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. घरफोडीचा गुन्हा इतक्या कमी वेळात उघडकीस आणल्याने पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button