AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; विप्लव बाजोरिया यांची अपक्ष उमेदवारी, चौरंगी लढतीचे संकेत

अमरावती, प्रतिनिधी : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार मैदानात असतानाच शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र, माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. वंचित बहुजन आघाडीकडून युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

मात्र दिवसातील सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली ती माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्या अपक्ष उमेदवारीची. शेवटच्या क्षणी अमरावतीत दाखल होत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे विप्लव बाजोरिया हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र आहेत.

त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर ही अपक्ष उमेदवारी मोठे आव्हान निर्माण करू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

या निवडणुकीत आता महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार अशी चौरंगी लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंख्या आणि पक्षीय समीकरणे लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीचा अंतिम निकालावर किती परिणाम होणार, तसेच महायुतीकडून यावर काय भूमिका घेतली जाणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button