अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिलदरम्यान ग्रॅनेटचा स्फोट; चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

अहिल्यानगर शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुरक्षा मॉकड्रिलदरम्यान मोठी दुर्घटना घडली. पोलीस मुख्यालय परिसरात सुरू असलेल्या सरावावेळी एका कर्मचाऱ्याच्या हातातच स्नो ग्रॅनेटचा स्फोट झाल्याने चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातात शिवराज पवार, शुभम कावरे, योगेश सोळुंके आणि गणेश मधे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. शुभम कावरे, शिवराज पवार आणि योगेश सोळुंके हे RCP पथकातील कर्मचारी असून गणेश मधे हे QRT पथकात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
स्फोट इतका भीषण होता की शुभम कावरे आणि शिवराज पवार यांच्या हाताच्या करंगळ्या तुटून वेगळ्या झाल्या. दोघांवर खासगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित जखमी कर्मचाऱ्यांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोणतेही पुरेसे पूर्व प्रशिक्षण न देता थेट स्नो ग्रॅनेट हाताळण्यास दिल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप समोर येत आहे. मॉकड्रिलदरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले का, तसेच प्रशिक्षण प्रक्रियेत काही हलगर्जीपणा झाला का, याबाबत आता चौकशी होण्याची शक्यता आहे.
ईदसारख्या संवेदनशील सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलीस दल सतर्क असून विविध ठिकाणी मॉकड्रिल आणि सुरक्षा सराव सुरू आहेत. मात्र अहिल्यानगरमधील या दुर्घटनेमुळे पोलीस प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



