citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; १४ दुचाकींसह तीन आरोपी अटकेत

नागपूरमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या धडाकेबाज कारवाईत तब्बल १४ दुचाकी वाहने आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

बजाज नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी गौरव मृगुवार यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा ॲक्टिव्हा वाहनाची चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. अपार्टमेंटसमोर पार्क केलेली दुचाकी सकाळी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

या तक्रारीनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पियुष रविंद्र जगनाडे हा वाहन चोरी प्रकरणात सहभागी असून तो लाखणी तालुक्यातील टेकेपार येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पोलिसांचे विशेष पथक रात्रीच लाखणीकडे रवाना झाले.

अतिशय शिताफीने पोलिसांनी पियुष जगनाडे याला पांढऱ्या रंगाच्या विनानंबर प्लेटच्या ॲक्टिव्हासह ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशीत त्याचे साथीदार अंशुल सरजारे आणि दीप रामटेके यांनाही पोलिसांनी अटक केली.

या तिघांकडून पोलिसांनी तब्बल १४ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये तीन नवीन बुलेट, आठ होंडा ॲक्टिव्हा, एक पल्सर 220, एक होंडा युनिकॉर्न आणि एक होंडा फॅशन प्रो यांचा समावेश आहे. तसेच दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल १३ लाख ५५ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास बजाज नगर पोलीस करत आहेत.

नागपूर पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून शहरातील वाहनमालकांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button