AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

वीज बिल भरूनही अंधारच; अमरावतीत वीजप्रश्नावर काँग्रेस आक्रमक, महावितरण अधिकाऱ्यांना जाब

अमरावती | प्रतिनिधी
वीज बिलांची शंभर टक्के वसुली होत असतानाही नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने थेट महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली आणि विविध प्रश्नांवर त्यांना धारेवर धरलं.

अमरावती शहरातील वाढत्या वीज समस्यांवर खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील वीज समस्यांबाबत थेट जाब विचारण्यात आला.

बैठकीत शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी शहरातील वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः शहरात सुरू असलेल्या भूमिगत केबलच्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास, नवीन वीज जोडणीतील अडथळे, तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावण्यात आलं.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की, अमरावती शहरात वीजबिलांची शंभर टक्के वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत वीज सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. नियमित बिल भरूनही नागरिकांना अंधारात राहावं लागत असेल, तर ही महावितरणची गंभीर निष्काळजीपणा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बैठकीत नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. शहरातील अनेक भागांत रोजच्या रोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच भूमिगत केबल प्रकल्पाच्या कामांमुळे रस्ते खोदले गेले असून, वाहतूक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचंही बैठकीत नमूद करण्यात आलं.

दरम्यान, या सर्व समस्यांचं तात्काळ निवारण न झाल्यास महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

अमरावतीतील वीजप्रश्न आता केवळ तक्रारींपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या दिशेने जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन या वाढत्या दबावाला कशा प्रकारे प्रतिसाद देतं आणि नागरिकांच्या समस्यांवर कितपत तत्परतेने उपाययोजना करतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button