agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिममध्ये अवकाळीचा तडाखा; हळद भिजली, केळीची बाग उद्ध्वस्त, शेतकरी संकटात

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात निसर्गाच्या अवकाळी कहराने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, हळद आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.

विशेषतः हळद उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने तयार केलेली आणि वाळत घातलेली हळद अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजली. त्यामुळे हळदीची गुणवत्ता घसरली असून, याचा थेट परिणाम बाजारभावावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हळदीचं उत्पादन तयार असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरवलं आहे. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि बाजारभावाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या आर्थिक संकटाचं सावट उभं राहिलं आहे.

दरम्यान, रिसोड शहरासह कंकरवाडी आणि आगरवाडी परिसरातही वादळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची उभी झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहेत. काही दिवसांतच उत्पादन हाती येणार असताना आलेल्या या पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमिनदोस्त झाल्याने लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनाच्या उंबरठ्यावर असताना झालेलं हे नुकसान शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक ठरत आहे.

या नुकसानीमुळे हळद आणि केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

हवामानाचा अंदाज चुकत असताना शेतकरी मात्र निसर्गाच्या भरवशावर उभा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आता सरकारकडून तातडीची मदत मिळते का, आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किती वेगाने पावलं उचलतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button