AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती विभागाचा बारावी निकाल 90.92%; बुलढाणा जिल्हा अव्वल, मुली पुन्हा आघाडीवर

बारावीचा निकाल जाहीर होताच अमरावती विभागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. यंदा अमरावती विभागीय मंडळाचा एकूण निकाल 90.92 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी नोंदवली आहे.

अमरावती विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी यंदा एकूण 1 लाख 46 हजार 148 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 1 लाख 13 हजार 195 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी 90.92 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल समाधानकारक लागला आहे.

जिल्हानिहाय निकालात बुलढाणा जिल्ह्याने बाजी मारत 95.22 टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल वाशिम जिल्हा 91.15 टक्के निकालासह दुसऱ्या स्थानावर आहे. अकोला जिल्ह्याने 90.14 टक्के निकालासह तिसरा क्रमांक मिळवला असून, यवतमाळ जिल्हा 89.69 टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे. अमरावती जिल्ह्याचा निकाल 88.26 टक्के लागला असून तो विभागात पाचव्या स्थानावर राहिला आहे.

यंदाही निकालात मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपली आघाडी कायम ठेवली आहे. मुलींचा निकाल 93.25 टक्के लागला असून मुलांचा निकाल 88.29 टक्के नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदाही ‘मुलीच पुढे’ हे चित्र कायम राहिलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील 9 विभागीय मंडळांमध्ये अमरावती मंडळाने यंदा तिसरा क्रमांक पटकावला आहे. हा निकाल विभागासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

सिटी न्यूज परिवारातर्फे बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच अपेक्षित निकाल न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करावेत, कारण प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button