अड्याळ गावावर दु:खाचा डोंगर; लग्नावरून परतताना भीषण अपघातात 5 ठार, गावकऱ्यांची माणुसकी ठरली आधार

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश असल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे. मात्र या दुर्दैवी घटनेतही गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी सर्वांना भावूक करून गेली.
आनंद, हशा आणि लग्नसोहळ्याचा उत्साह घेऊन अड्याळ गावातील वऱ्हाडी मंडळी समारंभ आटोपून परतत होती. मात्र नियतीने काही क्षणांतच सर्व काही हिरावून घेतलं. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत नगरे कुटुंबातील दुर्गा उर्फ शिला नगरे, त्यांची मुलगी नैना नगरे आणि श्वेता नगरे यांचा मृत्यू झाला. एकाच घरातील तीन महिलांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. याशिवाय प्रभाकर चाचेरकर आणि त्यांची पत्नी मुन्नी चाचेरकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातात काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्षा खेडकर आणि नेहा नान्हे या दोघी गंभीर अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहेत.
शुक्रवारी सकाळी मृतांच्या अंत्ययात्रा निघाल्या तेव्हा अड्याळ गाव अक्षरशः सुन्न झालं होतं. एकाच घरातील तीन चिता एकाचवेळी पेटताना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. गावभर हळहळ आणि शोककळा पसरली.
मात्र या दु:खद प्रसंगातही अड्याळ गावाने माणुसकीचं मोठं उदाहरण घालून दिलं. जखमी नेहा नान्हे हिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचं समजताच गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत तब्बल ७० हजार रुपयांची मदत जमा केली. हा निधी उपचारासाठी कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला असून, अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन करत मदतीचे आश्वासन दिले.
एकीकडे अपघाताने हिरावलेले पाच निष्पाप जीव…
आणि दुसरीकडे दु:खातही उभी ठाकलेली गावकऱ्यांची माणुसकी…
अड्याळ गाव आज अश्रूंमध्येही एकजुटीचं, संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं मोठं उदाहरण ठरत आहे…



