“उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही गुप्त बैठक नाही” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही तासांपासून रंगलेल्या ‘गुप्त बैठकी’च्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्वतःच पूर्णविराम दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थेने २२ एप्रिलच्या मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याचा दावा केला होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ठाम भूमिका मांडली.
त्र्यंबकेश्वर येथे भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंसोबत गुप्त बैठक घेण्याचं कारणच काय? आमच्यात असा कोणताही विषय नाही की तो गुप्तपणे चर्चिला जावा. उद्धव ठाकरे यांना भेटायचं असेल, तर आम्ही उघडपणे भेटू शकतो. अशी कोणतीही बैठक झालेली नाही.” अशा शब्दांत त्यांनी सर्व दाव्यांना स्पष्ट नकार दिला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचाली, विधान परिषद निवडणुका आणि बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या कथित बैठकीची चर्चा रंगली होती. मात्र, फडणवीस यांच्या स्पष्ट खुलाशामुळे या चर्चांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा सूर बदलला असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना आता अधिकृतरीत्या पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.



