citynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

नागपुरात सिगारेटच्या वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणावर जीवघेणा वार, आरोपींची पोलिसांकडून धिंड

नागपूर शहरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद क्षणात हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर कपिलनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आणि त्यांची थेट घटनास्थळी धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला.

ही घटना नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘हायवे बार अँड रेस्टॉरंट’मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या हल्लेखोरांनी यशोधरा नगर येथील रहिवासी शेख अकील याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात शेख अकील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने हालचाल करत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आणि परिसरात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना थेट ‘हायवे बार अँड रेस्टॉरंट’समोर आणत त्यांची धिंड काढली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या कारवाईची शहरभर जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांकडून कपिलनगर पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर लगाम घालण्यासाठी अशा प्रकारची तातडीची कारवाई गरजेची असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमकं कारण आणि आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपासही सुरू आहे.

किरकोळ वाद… क्षणात रक्तरंजित हल्ला… आणि त्यावर पोलिसांची थेट अॅक्शन… नागपुरातील ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर इशारा मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button