citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; काठीने मारहाण केल्यानंतर ऑटोने दिली धडक

कामठीतील धक्कादायक घटना; मुलीच्या वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा, आरोपी फरार

कामठी (जि. नागपूर) | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात प्रेमप्रकरणातून एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीसोबत बोलत उभा असल्याचे पाहून संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी तरुणावर प्रथम काठीने हल्ला केला आणि त्यानंतर ऑटोने धडक देत गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाची ओळख जमशेर ऊर्फ जम्मू मुनीर खान (वय २३) अशी असून, तो कामठीतील जुनी खलासी लाईन परिसरातील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेरचे कुंभारे कॉलनीतील २२ वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री दोघेही युवतीच्या घराजवळ उभे राहून संवाद साधत असताना ही घटना घडली.

यावेळी मुलीचे वडील विजय ऊर्फ टायसन नामदेव डोंगरे यांनी दोघांना एकत्र पाहिल्यानंतर संतापाच्या भरात जमशेरवर काठीने वार केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जमशेर जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र, आरोपीने ऑटोने त्याचा पाठलाग करून मागून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत जमशेर गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत जमशेरला प्रथम कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी विजय डोंगरे घटनास्थळावरून फरार झाला असून, मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे कामठी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक फरार आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button