खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप! चॉकलेटचे आमिष, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी

बुलढाण्यात ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
बुलढाणा | गजानन राऊत, सिटी न्यूज बुलढाणा
बुलढाणा शहरातून आठ वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलेल्या कथित लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका ६० वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शेख मोहम्मद पीर मोहम्मद याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून गैरवर्तन केल्याचा आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास बालिका खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला दुकानात बोलावले आणि तिच्याशी अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
व्हिडिओमुळे प्रकार आला समोर
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी सकाळी पालकांनी बालिकेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी बालिकेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील करीत आहेत. प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या चिमुकलीसोबत असा प्रकार घडल्याच्या आरोपामुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे. बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष तपास, उपलब्ध पुराव्यांची पडताळणी आणि कायद्यानुसार कठोर कारवाई महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बालिकेची ओळख गोपनीय ठेवणे आणि तिला आवश्यक मानसिक आधार मिळवून देणेही तितकेच गरजेचे आहे.
या गंभीर प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.



