citynewsLatest NewsMaharashtraWeather Report

वाशिममध्ये दुष्काळाची दाहकता वाढली! पैनगंगा नदी कोरडीठाक, ड्रोनमध्ये दिसली वाळूच वाळू

११ बॅरेजेसमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर; शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

वाशिम | सिटी न्यूज

वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीनेही तळ गाठला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच नदी कोरडीठाक पडल्याचे चित्र समोर आले आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या दृश्यांमध्ये नदीपात्रात दूरपर्यंत केवळ वाळूच दिसत असून, जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता स्पष्ट होत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होऊ शकला नाही. परिणामी, या बॅरेजेसमधील पाणीसाठाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाईही अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.

३३.२६ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता

पैनगंगा नदीवरील सर्व ११ बॅरेजेसची एकूण साठवण क्षमता ३३.२६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. दरवर्षी या बॅरेजेसमध्ये साठवलेले पाणी साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत सिंचनासाठी उपयोगी पडते. मात्र, यंदा कमी पावसामुळे बॅरेजेसमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर होऊ लागला आहे.

शेतकरी आणि नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट

नदीपात्र कोरडे पडत असताना बॅरेजेसमधील पाणीसाठाही घटत असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून पाणीवापराचे नियोजन आणि संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ड्रोन कॅमेरा सौजन्य : अमोल खडसे

सध्या पैनगंगा नदीचे समोर आलेले दृश्य वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button