धनज बुद्रुक आरोग्य केंद्राला लवकरच १०८ रुग्णवाहिका व एमबीबीएस डॉक्टर; जि.प. सीईओंचे आश्वासन

ग्रामस्थांच्या मागणीला यश; नवीन इमारतीच्या उद्घाटनासह आरोग्य सुविधा बळकट होणार
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. केंद्राला लवकरच नवीन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असून, कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी दिले आहे. या घोषणेमुळे धनज बुद्रुक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात तातडीच्या आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका आणि कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. यासंदर्भात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमानी, पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद अबरार, विशाल अघमे आणि नुरखॉं पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन तातडीने करण्यात यावे, तसेच केंद्रात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी पुढील महिन्यात नवीन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याशिवाय, राज्यभर सुरू असलेल्या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचा उल्लेख करत त्यांनी लवकरच मुलाखती पूर्ण करून धनज बुद्रुक येथे कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला डॉक्टरांचा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन रुग्णवाहिका, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि नवीन इमारतीच्या उद्घाटनामुळे धनज बुद्रुक तसेच परिसरातील हजारो नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, आता या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



