agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWashim

पावसाअभावी सोयाबीन करपले; शेतकऱ्यांचा संताप शेतातच पेटला

पांगरा बंदी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी केली; हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाळून गेल्याने शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे. पांगरा बंदी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतातच वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी करून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.

मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी आणि परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीन पिकावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पाने पूर्णपणे वाळून गेली असून, अनेक ठिकाणी झाडांना शेंगाही राहिलेल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनाची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या भागातील अनेक शेतकऱ्यांना यापूर्वीच दुबार पेरणीचा फटका बसला होता. दुबार पेरणी करून पीक उभे केले, मात्र त्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने उभे सोयाबीन पीक करपून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

पीक हातातून जात असताना प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. शेतातच वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी करून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

यावेळी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनीही शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुबार पेरणीचा खर्च, त्यानंतर पावसाची प्रतीक्षा आणि आता उभे पीक करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आता प्रशासनाकडून या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे कधी सुरू होतात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी जाहीर केली जाते, याकडे पांगरा बंदी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button