त्र्यंबकेश्वरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा जल्लोषात शुभारंभ; जलदिंडीने दिला जलजागृतीचा संदेश

राज्यात जलसंवर्धन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाचा व्यापक संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चा आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात शुभारंभ झाला. या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक जलदिंडीचे आयोजन करण्यात आले असून, ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला.
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक जलपूजन करून या जलयात्रेचा शुभारंभ केला. यावेळी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज तसेच आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलपूजनानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी शहरातून जल्लोषात मार्गस्थ झाली. ढोल, टाळ, मृदुंग आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या जलदिंडीने त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिमय आणि जलजागृतीच्या संदेशाने दुमदुमून गेली. शहरातून निघालेल्या या जलदिंडीचा समारोप श्री स्वामी समर्थ गुरूपीठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, आमदार गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पुरोहित संघाचे पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला. राज्यात पाण्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि जनजागृती यासाठी ही जलयात्रा महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्र्यंबकेश्वरातून निघालेल्या या जलदिंडीने जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे…
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या माध्यमातून राज्यात जलजागृतीची नवी चळवळ उभी राहणार आहे…
आणि लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापनाचा संकल्प अधिक बळकट होणार आहे…



