माहूर पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक सण उत्सवासाठी पोलिसांची मोठी तयारी

नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी माहूर पोलिसांनी दंगा काबू नियंत्रण पथकाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध चौकांमध्ये हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या प्रात्यक्षिकाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलिसांच्या तयारीची माहिती घेतली.
माहूर हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून येथे वर्षभर यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि विविध मिरवणुका आयोजित केल्या जातात. आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पोलिसांनी ही पूर्वतयारी केली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी नागरिक, जयंती उत्सव मंडळे आणि मिरवणूक आयोजकांना कायद्याचे पालन करण्याचे तसेच शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.



