अमरावती जिल्हा न्यायालयात बॉम्बची अफवा; पोलिसांकडून प्रिकॉशनरी मॉक ड्रिल!

न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना न्यायालयाबाहेर काढले; पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी दिली माहिती, दिवाळीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची खबरदारी
अमरावती : अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. या माहितीमुळे न्यायालय परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने परिसराची तपासणी केली. मात्र, हा संपूर्ण प्रकार प्रत्यक्ष बॉम्बची माहिती मिळाल्यामुळे नसून पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेली खबरदारीची मॉक ड्रिल असल्याचे पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना स्पष्ट केले.

बॉम्ब असल्याची माहिती पसरताच जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाज आणि परिसरातील हालचालींबाबत खबरदारी घेण्यात आली. न्यायालयात उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील तसेच विविध खटल्यांसाठी आलेल्या पक्षकारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यानंतर पोलीस उपायुक्त शाम घुगे यांच्यासह पोलीस बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी पोलिसांकडून ही प्रिकॉशनरी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, पोलिसांचा प्रतिसाद आणि सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय तपासणे हा या सरावामागील उद्देश असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, बॉम्ब असल्याची अफवा आणि प्रत्यक्षात मॉक ड्रिल यामुळे न्यायालय परिसरात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी ही खबरदारीचा भाग म्हणून केलेली मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या घटनेचे स्वरूप स्पष्ट झाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.



