पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा; आमदार श्वेता महाले पाटील यांची मागणी!

वरच्या आणि खालच्या भागातील शेतकऱ्यांना समान न्याय द्या; उभी पिके वाचविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करा, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन
बुलढाणा | गजानन राऊत
पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी समन्यायी पाणीवाटपाची भूमिका मांडली आहे. धरणातून खालच्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यापूर्वी वरच्या भागातील शेतकऱ्यांचे बंद करण्यात आलेले पाणी कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावेत. तसेच उपलब्ध पाण्याचे वरच्या आणि खालच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये समान पद्धतीने वाटप करण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांची उभी पिके वाचविणे महत्त्वाचे असून, कोणत्याही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेनटाकळी धरणाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार महाले पाटील यांनी पाणीवाटपाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. धरणातील आरक्षित पाणी वगळता शिल्लक असलेले पाणी खालच्या भागात सोडण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, पाणी सोडण्याचा निर्णय घेताना वरच्या भागातील ज्या शेतकऱ्यांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले आहेत, त्यांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कोणत्याही तालुक्यातील असो, त्याच्या पिकांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खालच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी देताना वरच्या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष होता कामा नये. बंद करण्यात आलेली कनेक्शन पुन्हा जोडून दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा न्याय्य वाटा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या परिस्थिती काहीशी समाधानकारक वाटत असली, तरी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आगामी काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत दुष्काळासंदर्भातील विविध प्रश्नांवर योग्य निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाण्याची बचत करणे, सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आणि त्यानंतर उपलब्ध शिल्लक पाण्यातून शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रशासनासह सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासनाने पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पेनटाकळी धरणाच्या प्रश्नावर शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमूलकर हे धरणाच्या पात्रात आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबत विचारले असता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते उपोषण करीत असतील तर ती चांगली गोष्ट असल्याचे आमदार महाले पाटील म्हणाल्या. मात्र, या प्रश्नाकडे केवळ खालच्या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून न पाहता वरच्या भागातील शेतकऱ्यांचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना जात, धर्म, पक्ष किंवा तालुक्याची मर्यादा नसते. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नात कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. वरच्या आणि खालच्या भागातील शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी पेनटाकळीच्या उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप हाच या प्रश्नावरील योग्य मार्ग असल्याची भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी मांडली.
सिटी न्यूजसाठी गजानन राऊत, बुलढाणा.



