citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात घरफोडीचा पर्दाफाश; ४२.७९ लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त!

बजाजनगरमधील घरफोडीचा गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाकडून उलगडा; १९ वर्षीय आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईत एका १९ वर्षीय आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख ७९ हजार ९९० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

बजाजनगर पोलीस ठाण्यात घरफोडीप्रकरणी गुन्हा क्रमांक ५०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. त्यासाठी तांत्रिक तपासासह अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. या तपासातून गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईत करण खेमचंद मेश्राम (वय १९, रा. लष्करीबाग, तक्षशिला बौद्धविहाराजवळ, गल्ली क्रमांक ८, पाचपावली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून २९६.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्यांची अंदाजे किंमत ४१ लाख ४४ हजार ९८० रुपये आहे. तसेच ६२४.९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ज्यांची किंमत १ लाख २४ हजार ९८६ रुपये आहे, तेही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ४२ लाख ७९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार प्रशांत गभने, गणेश बरडे, सहायक फौजदार नितीन तिवारी, पोलीस शिपाई पंकज निकम, अमन राऊत आणि सुधीर पवार यांनी केली. तसेच सायबर विभाग, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे आणि त्यांच्या पथकाने तपासात विशेष सहकार्य केले.

गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button