नीता अंबानींच्या वाढदिवसानिमित्त करजतमध्ये ‘अनंत आश्रय’ची पायाभरणी!

१०० एकरांवर साकारणार भव्य केअर टाउनशिप; अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरजा असलेल्या ५ हजारांहून अधिक व्यक्तींना मिळणार आयुष्यभराचा आधार
मुंबई/करजत : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील करजत येथे सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ या केअर टाउनशिपची पायाभरणी आणि भूमिपूजन केले. सुमारे १०० एकर परिसरात उभारण्यात येणारा हा प्रकल्प अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विकासात्मक विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी समर्पित असणार आहे. ना-नफा तत्त्वावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून गरजू व्यक्तींना निवास, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि आयुष्यभराची काळजी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी टाउनशिपमध्ये ५ हजारांहून अधिक रहिवाशांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. रहिवाशांसोबत त्यांची काळजी घेणारे कर्मचारी, वैद्यकीय तज्ज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करता संपूर्ण परिसराची लोकसंख्या सुमारे १५ हजारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. केवळ निवासाची सुविधा न देता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी या प्रकल्पाची रचना करण्यात येत आहे.
आठ निवासी गावे आणि कुटुंबासारखे वातावरण
‘अनंत आश्रय’मध्ये आठ स्वतंत्र निवासी गावे उभारण्यात येणार असून, त्यांना भारतातील पवित्र नद्यांची नावे दिली जाणार आहेत. पारंपरिक अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमाच्या संस्थात्मक पद्धतीऐवजी येथे कुटुंबासारखे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक निवासी घरामध्ये ‘हाऊस पॅरेंट्स’ आणि केअरगिव्हर्स यांच्या सहवासात रहिवाशांना राहण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलेपणा, सुरक्षितता आणि भावनिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि पुनर्वसन सुविधा
या टाउनशिपमध्ये अत्याधुनिक रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी दंतचिकित्सा सुविधा, एपिलेप्सी युनिट आणि पॅलिएटिव्ह केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि हायड्रोथेरपीसारख्या विशेष उपचार सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक रहिवाशाच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र काळजी आणि उपचारांचे नियोजन केले जाणार आहे.
शिक्षण, रोजगार आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर
निवास आणि आरोग्यसेवेबरोबरच रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या परिसरात मंदिर, उद्याने, शेतीक्षेत्र, खेळाची मैदाने, कार्यशाळा, कॅफे आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. तसेच वंतारा येथील तज्ज्ञांच्या सहकार्याने प्राणी-सहवासासाठी विशेष फार्म उभारण्यात येणार आहे. प्रत्येक रहिवाशाच्या क्षमता आणि गरजांनुसार वैयक्तिक काळजी व विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
स्थानिक नागरिकांनाही मिळणार सुविधांचा लाभ
‘अनंत आश्रय’ हा प्रकल्प केवळ टाउनशिपमधील रहिवाशांपुरता मर्यादित राहणार नसून परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. आसपासच्या भागातील सुमारे एक हजार नागरिकांना थेरपी, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याशिवाय मोबाइल क्लिनिक, रिस्पाईट हाऊसेस आणि विविध जनसंपर्क उपक्रमांच्या माध्यमातून शेजारील गावांपर्यंत आरोग्य व सामाजिक सेवा पोहोचविण्यात येणार आहेत.
या भूमिपूजन सोहळ्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. आवश्यक शासकीय मंजुरी आणि परवानग्यांनुसार या प्रकल्पाची उभारणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना केवळ आश्रय नव्हे, तर सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची संकल्पना ‘अनंत आश्रय’च्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



