पेनटाकळी धरणातून कधीही होऊ शकतो पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा 56.51 टक्क्यांवर; नदीपात्रात न जाण्याचे आणि जनावरे सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन
मेहकर (जि. बुलढाणा) | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून आवश्यकतेनुसार कधीही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा महत्त्वाचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि गुराखी यांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पेनटाकळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातील जलसाठा वेगाने वाढत आहे. सध्या धरणात 56.51 टक्के पाणीसाठा झाला असून, मंजूर जलाशय संचालन नियमानुसार जलस्तर नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार धरणाच्या वक्रद्वारातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर पेनटाकळी, दुधा, रायपूर, नांद्रा, पाचला, बाऱ्हई, भालेगाव, गौंढाळा, कंबरखेड, नेमतापूर, फरदापूर, मेहकर, सारंगपूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी आणि गणपूर या गावांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळण्याचे, नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर न करण्याचे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी नदीलगतच्या शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय, ही केवळ पूर्वसूचना असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिस्थितीवर संबंधित विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
पेनटाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी अल्पावधीत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



