गोरेवाडा अपघातानंतर बबलू कुलमेथे कुटुंबीयांची पोलीस ठाण्यात धाव!

आरोपी महिला चालकावर कठोर कारवाईची मागणी; गिट्टीखदान पोलिसांकडून तपास सुरू
नागपूर : गोरेवाडा परिसरातील भीषण अपघातात बबलू कुलमेथे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी आज गिट्टीखदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. बबलू कुलमेथे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती कुटुंबीयांनी घेतली.
यावेळी कुटुंबीयांनी आरोपी महिला चालकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहनचालकाची भूमिका आणि घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बबलू कुलमेथे यांच्या कुटुंबीयांसोबत समाजसेवक आणि ॲडव्होकेट शहबाज सिद्दिकी यांनीही गिट्टीखदान पोलीस ठाण्यात उपस्थित राहून कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
अपघातानंतर पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली, आरोपी महिला चालकाविरोधातील पुढील प्रक्रिया काय आहे आणि तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांकडून माहिती घेतली.
दरम्यान, बबलू कुलमेथे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे कुटुंबीयांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



