नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा जोर; भोकरसह अनेक भागांत शेती पिकांचे नुकसान

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. हवामान विभागाने यापूर्वीच पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
नांदेड शहर आणि भोकर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला, फळबागा आणि काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वीजपुरवठाही खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये तसेच सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आता पुढील काही दिवस हवामान कसे राहणार आणि प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना किती लवकर मदत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



