दयापूरमधील दिवसाढवळ्या घरफोडीचा गुन्हा उघड; महिला आरोपीसह दोघांना अटक

दयापूर येथे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महिला आरोपीसह दोघांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे ४ लाख ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सीमा परवीन नसीम शेख (वय ४५, रा. सादिया नगर, अमरावती) आणि विवेक यादवकुमार कुंबलवार (वय ४०, रा. लक्ष्मी नगर, अमरावती) यांचा समावेश आहे.
दयापूर येथील रहिवासी प्रतापसिंग रूपसिंग तंवर यांनी ९ एप्रिल रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी दयापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हा गुन्हा सीमा परवीन शेख हिने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीतील दागिने विवेक कुंबलवार याला विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी विवेक कुंबलवार यालाही अटक केली. त्याच्याकडून सराफा बाजारातील एका सोनाराकडे विक्रीसाठी दिलेले ३४ ग्रॅम ६० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या दागिन्यांची किंमत ४ लाख ९६ हजार ४८० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



