अमरावतीत थरारक घटना! मुलाकडून वडिलांची हत्या

अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मुलाने स्वतःच्या वडिलांचाच जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रेवसा गावात ही भयावह घटना घडली. मृत व्यक्तीचं नाव जनार्दन श्रीराम केवदे (वय ५२ वर्षे) असून आरोपी हा त्यांचाच मुलगा धीरज जनार्दन केवदे (वय १८ वर्षे) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धीरज दारूच्या नशेत घरी आला. यावेळी किरकोळ कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. हा वाद इतका चिघळला की, संतापाच्या भरात धीरजने घरात असलेल्या लाकडी टोम्प्याने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात जनार्दन केवदे गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
👉 “क्षणिक राग, दारूची नशा… आणि एका कुटुंबाचा कायमचा विनाश!”
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की घरगुती वाद आणि व्यसन यांचे परिणाम किती भयानक असू शकतात.



