IPLच्या आड ऑनलाइन सट्टा रॅकेटचा पर्दाफाश! नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नागपूर शहरात IPL क्रिकेटच्या थराराच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या ऑनलाइन सट्टा रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट क्र. 02 ने छापा टाकत पाच आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई चेन्नई विरुद्ध दिल्ली या IPL T-20 सामन्यादरम्यान करण्यात आली. सिद्धांत सक्षम अपार्टमेंट, आयटी पार्क परिसरात सुरू असलेल्या या अवैध सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमन पाठक, आकाश गुहिल, श्रेयस लांजेवार, मुशीर अहमद यांचा समावेश असून एक आरोपी फरार आहे.
👉 तपासात उघड झालेलं धक्कादायक वास्तव —
आरोपी बनावट ऑनलाइन गेमिंग लिंक तयार करून लोकांना यूजर आयडी आणि पासवर्ड देत होते. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात सट्टा खेळवला जात होता.
👉 व्यवहारासाठी बनावट आणि भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांचा वापर करून शासनाचा करही बुडवला जात होता.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महागडे मोबाईल फोन आणि ११ बँक पासबुकचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
👉 महत्त्वाची सूचना:
IPLचा आनंद घेताना अशा बनावट ऑनलाइन लिंकपासून सावध राहा.
कारण अशा सट्टा रॅकेटमुळे आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
“क्रिकेटचा थरार… पण सावधगिरीही तितकीच गरजेची!”



