वाघाचा हल्ला: उमरझरी शिवारात महिला गंभीर, ग्रामस्थांचा संताप उसळला

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरझरी शिवारात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. माया रामकृष्ण सोनवणे (वय ५२) या महिला मिरची तोडण्यासाठी शेतात गेल्या असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या पतींनी प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरड केली आणि हातातील थैली वाघाच्या दिशेने फेकत त्याला पळवून लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमी अवस्थेत असलेल्या माया सोनवणे यांना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्या कोमामध्ये गेल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी नवेगाव-नागझिरा मार्गावर चक्का जाम आंदोलन छेडले. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, या मागण्यांवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिसरात वाघाच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



