Chhatrapati Sambhaji NagarcitynewsLatest NewsMaharashtra

खुलताबादमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड: कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि पत्नीवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मजहर खान आणि त्यांच्या पत्नीवर धर्मदाय आयुक्त कार्यालय व बँकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. बनावट कागदपत्रे, सह्या आणि शिक्क्यांच्या आधारे कोट्यवधींचे कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आला आहे.

तक्रारदार झेबा इद्रीस खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी 1992 मध्ये कोहिनूर शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत दोन महाविद्यालये चालवली जातात. मात्र, सध्याचे अध्यक्ष मजहर खान आणि सचिव असलेल्या त्यांच्या पत्नीने संस्थेच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 4 कोटी 96 लाख 399 रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला असून, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार,

  • चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून सुमारे 2 कोटी 94 लाख 399 रुपये
  • तसेच प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडकडून 2 कोटी रुपये

अशा प्रकारे एकूण जवळपास 5 कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. या कर्जासाठी संस्थेच्या जमिनी गहाण ठेवण्यात आल्या. मात्र, हे पैसे संस्थेच्या खात्यात न जमा करता थेट वैयक्तिक खात्यात वळवण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मजहर खान आणि त्यांच्या पत्नीवर यापूर्वीही विविध राज्यांमध्ये बनावट पदविका आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. मजहर खान यांनी जौनपूर येथील एका विद्यापीठाची बनावट विधी पदवी वापरून बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळवल्याचाही आरोप आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश दिले होते.

सध्या या प्रकरणाचा तपास सिटी चौक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या घोटाळ्यात आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

खुलताबादमधील या प्रकरणामुळे शिक्षण संस्थांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button