citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

पुसदमध्ये हृदयद्रावक घटना: मुलाने आईला घराबाहेर काढले, ‘माणुसकीची भिंत’ ठरली आधार

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून एक हृदयद्रावक पण माणुसकीचा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करणाऱ्या एका वृद्ध आईला तिच्याच मुलाने म्हातारपणी घराबाहेर काढल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मात्र या अंधारात “माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन” या संस्थेने दाखवलेली माणुसकी आशेचा किरण ठरली आहे.

“स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी…” या ओळी आईचे महत्त्व सांगतात, पण आजच्या बदलत्या समाजात याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयाबाहेर गेल्या तीन दिवसांपासून एक वृद्ध महिला उपाशीपोटी एकटी बसलेली असल्याची माहिती समोर आली.

ही बाब समजताच “माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन” चे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची विचारपूस केली असता, तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. तिने सांगितले की, “माझा मुलगा आणि सून घराला कुलूप लावून मला एकटीला सोडून गेले. काही दिवस नातेवाईकांकडे राहिले, पण कुणीही मला स्वीकारले नाही. मला सांगितले की ‘माणुसकीची भिंत’ येथे जेवण मिळते, म्हणून मी येथे आले.”

तीन दिवस उपाशीपोटी राहिल्यामुळे महिलेची प्रकृती अत्यंत खालावली होती. ही परिस्थिती पाहून संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृहचे व्यवस्थापक श्री. वाघु आडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी येऊन महिलेची पाहणी केली आणि तिला आश्रय देण्याचा निर्णय घेतला.

यानंतर संस्थेच्या सदस्यांनी त्या महिलेला अन्न व वस्त्र उपलब्ध करून देत सुरक्षितपणे स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृहात दाखल केले.

गेल्या दहा वर्षांपासून “माणुसकीची भिंत” ही संस्था रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्ण आणि बेघर वृद्धांना मदत करत असून, अनेकांना नवजीवन देण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे एकीकडे समाजातील काही लोकांची संवेदनाहीनता समोर येत असताना, दुसरीकडे अशा संस्था मानवतेची ज्योत जिवंत ठेवत असल्याचे दिसून येते.

आई-वडिलांना एकटे सोडणाऱ्या मुलांसाठी ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करत असून, समाजात माणुसकी टिकून आहे का, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button