ब्रेकिंग न्यूज – आंध्र प्रदेश हादरलं, भेसळयुक्त दूध पिल्याने १६ जणांचा मृत्यू, ३ गंभीर

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्हा येथे दुधातील भेसळीच्या भीषण प्रकारामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला असून, ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगर परिसरात नागरिक अचानक आजारी पडू लागले होते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही प्रकरणे पुढे गंभीर बनली. दूध पिल्यानंतर उलट्या, पोटदुखी, लघवी बंद होणे आणि किडनी फेल होण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली.
तपासात उघडकीस आलं की, एका स्थानिक डेअरी युनिटकडून पुरवण्यात आलेल्या दुधात एथिलीन ग्लायकॉल हा अत्यंत विषारी पदार्थ मिसळण्यात आला होता. हा पदार्थ सामान्यतः अँटी-फ्रीझमध्ये वापरला जातो आणि मानवी शरीरासाठी अत्यंत घातक मानला जातो.
या प्रकरणात २० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटरची गरज भासली. तपासात रक्तातील युरिया आणि क्रिएटिनिनची पातळी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने संबंधित डेअरी सील करून तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.देशभरात अन्नसुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



