मोठी घसरण! सोनं-चांदी दर कोसळले; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम आता मौल्यवान धातूंवर दिसू लागला आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सहसा सोनं-चांदीचे दर वाढतात, मात्र यावेळी उलट चित्र समोर आले असून दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये मोठी पडझड झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १३ मार्च रोजी चांदीचा दर प्रति किलो २,५९,४३५ रुपये होता. तो शुक्रवारी थेट २,२७,४७० रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या पाच दिवसांत चांदी तब्बल ३१,९६५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे, २९ जानेवारीला चांदीने ४.२० लाखांचा उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता ती जवळपास १.९२ लाखांनी घसरली आहे.
सोन्याच्या दरातही मोठी नरमाई पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोनं प्रति १० ग्रॅम १३,६४१ रुपयांनी घसरले. १३ मार्च रोजी १,५८,४६६ रुपये असलेला दर शुक्रवारी १,४४,८२५ रुपयांवर आला. जानेवारीतील १,९३,०९६ रुपयांच्या उच्चांकाच्या तुलनेत सोनं आता ४८,२७१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर मागणीत घट, तसेच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात Profit Booking केल्यामुळे ही घसरण झाली आहे. डॉलरची मजबुती आणि इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळलेला कल देखील यामागे कारणीभूत मानला जात आहे.
दरम्यान, या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांसाठी मात्र खरेदीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. आगामी लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



