अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला! उद्या २६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

लोकशाही भवनातील स्ट्रॉंग रूमची विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याकडून पाहणी; सीसीटीव्हीसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था
अमरावती | सिटी न्यूज
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीत २६ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीतील लोकशाही भवन येथे मतमोजणीची तयारी करण्यात आली असून, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी
विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकशाही भवन येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. मतमोजणीपूर्वी मतपेट्यांची सुरक्षा, सीसीटीव्ही निगराणी आणि पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.
सीसीटीव्हीसह तगडा पोलीस बंदोबस्त
स्ट्रॉंग रूम परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
उद्या २६ उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष
अमरावती विभागातील शिक्षक मतदारांनी मतदानातून आपला कौल दिला असून, आता मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातील २६ उमेदवारांसह त्यांचे समर्थक आणि शिक्षक मतदारांचेही मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, लोकशाही भवन येथे उद्या होणाऱ्या प्रक्रियेत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतात आणि अंतिम निकाल काय लागतो, याची उत्सुकता वाढली आहे.
सिटी न्यूज | अमरावती



