AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत आयुती पेंढारीची चमकदार कामगिरी! कांस्यपदकासह बोर्ड प्राईझवर नाव कोरले

पेंढारी मित्रमंडळातर्फे आयुतीचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव; मान्यवरांकडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

अमरावती | प्रतिनिधी

राजस्थान येथे पार पडलेल्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आयुती अनित पेंढारी हिने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकासह बोर्ड प्राईझ प्राप्त केला. तिच्या या यशाबद्दल अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव

या सत्कार समारंभाचे आयोजन दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक हुंडीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका रजिया सुलताना, सेवानिवृत्त मुख्य अभियंता अनिल सुराणा, नगरसेविका ललिताताई रतावा, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ हाडोळे आणि महेंद्र देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभिनंदन पेंढारी यांनी आयुतीच्या बुद्धिबळातील प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर आयुती पेंढारी हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोत्यांची माळ आणि गौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवरांकडून आयुतीच्या यशाचे कौतुक

यावेळी नगरसेविका ललिताताई रतावा, रजिया सुलताना, ज्योती कारंजकर, अनिल सुराणा, दीपक हुंडीकर, राजाभाऊ हाडोळे, प्रदीप शेवटकर, महेंद्र देशमुख, रुपेश नगरनाईक, प्रा. राधेश्याम यादव, राजाभाऊ पेंढारी, अरुण बनारसे आणि मनोहर राजगुरू यांनी मनोगत व्यक्त केले.

आयुतीने मिळवलेले यश अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत मान्यवरांनी तिचे कौतुक केले. भविष्यातही तिने बुद्धिबळाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अमरावतीचे नाव उंचवावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजनांना

सत्काराला उत्तर देताना आयुती पेंढारी हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, कुटुंबीय आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाला दिले. या सत्कारामुळे भविष्यातील स्पर्धांसाठी नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याचे तिने सांगितले.

यापुढील स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धारही आयुतीने व्यक्त केला.

मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता

कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी यांनी केले, तर अनित पेंढारी यांनी आभार मानले. यावेळी सौ. अनिला पेंढारी, आशाली पेंढारी, सौ. राजगुरू वहिनी आणि पेंढारी परिवारातील सदस्य उपस्थित होते. मिठाई वाटप करून या आनंदसोहळ्याची सांगता करण्यात आली.

आयुती पेंढारीच्या या यशामुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button