अमरावतीत जागतिक जल दिन उत्साहात साजरा

अमरावती येथे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन अमरावती केंद्र, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अमरावती केंद्र, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२६ रोजी जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवटेकडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून भव्य जलदिंडी काढण्यात आली. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी हिरवी झेंडी दाखवत जलदिंडीचे उद्घाटन केले. ही जलदिंडी बस स्टँड – इर्विन चौक – पंचवटी – शासकीय तंत्रनिकेतन मार्गे जात अभियंता भवन येथे विसर्जित झाली. या जलदिंडीत सुमारे ३०० हून अधिक जलप्रेमी, अभियंते व विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर अभियंता भवन येथे भारतरत्न अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच अमरावती जिल्ह्यातील सात नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करण्यात आले. “पाणी आणि समानता” या विषयावर सुप्रसिद्ध जलतज्ञ अभिजीत घोरपडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजही जगातील सुमारे १८० कोटी लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध नाही, तर २६% महिला व मुलींना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. महिलांना पाणी भरण्यासाठी दररोज प्रचंड वेळ खर्च करावा लागतो, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते तसेच सुमारे २०० अभियंते, कंत्राटदार व विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



