भंडाऱ्यावर पावसाचा कहर! शेकडो हेक्टर धानशेती जलमय, रस्ते बंद शेतकरी आर्थिक संकटात

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून विविध भागांमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सततच्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मार्गांवरील वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नदीकाठावरील शेकडो हेक्टर धानशेती पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. अनेक ठिकाणी शेतीसाठी वापरण्यात येणारे पंप, मोटारी, पाइप आणि इतर साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



