कंटेनरमधून ५३ गायींची सुटका

मालेगाव तालुक्यातील पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाडसी मोहिम हाती घेतली. ग्रीन प्लाझा हॉटेलसमोर रात्री उशिरा कंटेनरवर धाड टाकली असता एचआर–६७ बी–३६१३ क्रमांकाचं वाहन जप्त करण्यात आलं. या वाहनातून तब्बल ५३ गायींना मुक्त करण्यात आलं. गायींना कत्तलखान्यात नेलं जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
वाहनचालक किरण भगवान राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला गेला. त्यात भारतीय दंड संहिता कलम ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम आणि प्राणी क्रूरता निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या धाडीत उपनिरीक्षक तुषार भदाणे, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रकाश बनकर, अमोल शिंदे, पोलिस नाईक हेमंत देवरे आणि शिपाई सूर्यकांत मोरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक फुलमाळी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक करत होते. प्रवास करताना वाहनाला तिथल्या राज्याची नंबर प्लेट लावून पोलिसांना दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला गेला होता. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या आदेशानुसार ही मोहीम पार पडली. यानंतर पुन्हा एकदा पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य अधोरेखित झालं – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय!’ या धाडसी कारवाईनंतर गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांच्या कार्याचं कौतुक होत आहे. खरंतर, मालेगाव तालुका पोलिसांनी दाखवून दिलं की कायद्याचा धाक अजूनही कायम आहे आणि गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही.



