BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

पावसाने पाठ फिरवली, तरी सर्जा राजाचा सन्मान कायम! खंडाळा देवीत बैलपोळ्याचा जल्लोष

बैलांची आकर्षक सजावट, विधिवत पूजन आणि पुरणपोळीचा नैवेद्य; बैलांची कमतरता असतानाही ग्रामस्थांनी जपली परंपरा

खंडाळा देवी, ता. मेहकर, जि. बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीसमोर मोठे आव्हान उभे असतानाही वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात साथ देणाऱ्या सर्जा राजाचा सन्मान करण्याची परंपरा खंडाळा देवी येथील ग्रामस्थांनी यंदाही कायम ठेवली. पावसाअभावी निर्माण झालेल्या चिंतेच्या वातावरणातही बैलपोळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवले. बैलांच्या अंगावर सुंदर झुली चढवण्यात आल्या, तर विविध सजावटीच्या वस्तूंनी त्यांचा साजशृंगार करण्यात आला. त्यानंतर बैलांची विधिवत पूजा आणि आरती करून सर्जा राजाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

गृहिणींनीही या उत्सवात उत्साहाने सहभाग घेत बैलांसाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांना प्रेमाने पुरणपोळी भरवून त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा करण्यात आला.

विशेष म्हणजे यंदा गावात बैलांची कमतरता जाणवली. शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वाढता वापर आणि बदलती परिस्थिती यामुळे बैलांची संख्या कमी होत असल्याचे चित्र अनेक ग्रामीण भागांत दिसून येते. मात्र उपलब्ध असलेल्या बैलांचा सन्मान करत खंडाळा देवीतील ग्रामस्थांनी पोळ्याची परंपरा आणि ग्रामीण संस्कृती जपली.

पावसाअभावी शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले असतानाही पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येने बैलपोळा उत्सवात सहभाग घेतला. त्यामुळे गावातील वातावरण काही काळ उत्साहपूर्ण आणि भक्तिमय झाले होते.

बैलपोळा हा केवळ एक सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी ग्रामीण संस्कृतीची परंपरा आहे. याच भावनेतून खंडाळा देवी येथे सर्जा राजाला मानाचा मुजरा करत बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांचा ग्रामीण भागातील बैलपोळ्याच्या उत्साहाचा हा खास रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button