citynewsCrime NewsWardha

तान्हा पोळ्याच्या दिवशी वडिलांची हत्या; मुलासह साथीदार ताब्यात

विरूळ आकाजी येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पुलगाव पोलिसांकडून तपास सुरू

वर्धा जिल्ह्यात तान्हा पोळ्याच्या उत्साहाला रक्तरंजित गालबोट लागले आहे. विरूळ आकाजी येथे कौटुंबिक वादातून वडिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतकाचा मुलगा प्रणय चौधरी याच्यासह एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विरूळ आकाजी येथे आज दुपारी साडेएक वाजताच्या सुमारास परमेश्वर चौधरी आणि त्यांचा मुलगा प्रणय चौधरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या घटनेत परमेश्वर चौधरी यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर परमेश्वर चौधरी यांचा मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही बाब समोर येताच गावात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रणय चौधरी याच्यासह एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

ही घटना नेमक्या कोणत्या कौटुंबिक कारणातून घडली, तसेच हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुलगाव पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button