चांदूर बाजारात AI मुळे वाघ दिसल्याची अफवा

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात वाघ दिसल्याच्या खोट्या माहितीने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली… देऊरवाडा-देवगाव शेतशिवारात वाघ दिसल्याची माहिती एका युवकाने दिल्यानंतर नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना कळवली… त्यानंतर शिरजगाव कसबा पोलिसांनी रात्री घटनास्थळी पोहोचत दवंडी पिटून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला… तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले…

मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या तपासात या संपूर्ण घटनेमागचे धक्कादायक सत्य समोर आले… संबंधित युवकाने AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाघाचे फोटो तयार करून ते खरे असल्याचे भासवत नागरिकांमध्ये ही खोटी माहिती पसरवल्याचे तपासात निष्पन्न झाले… त्यामुळे AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले…
या घटनेनंतर अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे… सोशल मीडिया किंवा कोणत्याही माध्यमातून वन्यप्राण्यांबाबतची माहिती समोर आल्यास तिची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये… तसेच अफवा पसरवणाऱ्या किंवा खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे…
अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सिटी न्यूजशी बोलताना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती संबंधित यंत्रणेकडून पडताळून घेण्याचे आवाहन केले आहे.



