Latest NewsYavatmal

यवतमाळच्या किन्ही येथील हिळवळ ढाब्यावर तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

यवतमाळ : यवतमाळ शहरालगत असलेल्या किन्ही परिसरातील हिळवळ ढाब्यावर रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. विजय राठोड या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ढाब्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, विजय राठोड हा तरुण कामानिमित्त ढाब्यावर गेला असता, तेथील एका व्यक्तीशी वाद झाला. या वादातून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या विजय राठोड याला तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हा ढाबा एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली असून, घटनेनंतर काही वेळ घटनास्थळी जाण्यास टाळाटाळ केली गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून या घटनेला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ढाब्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर कृती उघडकीस
नातेवाईक व स्थानिक नागरिकांच्या मते, हिळवळ ढाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री नियमित सुरू असते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक येथे थांबत असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून बंद ठेवले जातात, असेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button