India NewsLatest News

मुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन

आपल्या मुलाने खूप शिकावं आणि प्रत्येक परीक्षेत अव्वल यावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांचं भविष्य उज्वल होण्याच्या हेतूने त्यांच्यासाठी सर्वोत्तम शाळा, कॉलेज निवडले जातात. इतकंच नाही तर शाळेव्यतिरिक्त इतर क्लासेसही लावले जातात. त्यामुळेच मूल जेव्हा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतं तेव्हा पालकांना आपल्या सगळ्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. पण जर हेच मूल नापास झालं तर मात्र सगळी मेहनत वाया गेली अशी खंत करत राहतात. पण कर्नाटकमध्ये याउलट चित्र पाहायला मिळालं. मुलगा दहावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आई-वडिलांनी सेलिब्रेशन करत आनंद साजरा केला.

कर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले. तो सर्व सहा विषयांमध्ये नापास झाला. त्याला दहावीच्या परीक्षेत फक्त 32 टक्के मिळाले. मुलाचा निकाल निराशाजनक असला तरी तो जगाचा काही अंत नाही अशीच भावना या आई-वडिलांची होती. आपल्या मुलाची हार न मानण्याची प्रवृत्ती त्यांच्यासाठी आशेचा किरण होती.

एकीकडे परीक्षेत नापास झाला म्हणून मित्र खिल्ली उडवत असताना, त्याचे पालक मात्र पाठीशी उभे राहिले. नापास झाल्याबद्दल मुलाला ओरडण्याऐवजी किंवा त्याला खोलीत कोंडून ठेवत निऱाशा व्यक्त करण्याऐवजी पालकांनी केक कट करुन आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मुलाचा उत्साह कायम राहिला.

पालकांनी मुलाला सांगितलं की, “तू परीक्षेत नापास झाला असलास, तरी आयुष्यात नाही. तू नेहमीच नव्याने प्रयत्न करु शकतोस आणि पुढील प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस”. अपयश मिळूनही आई-वडील पाठीशी उभे राहिल्याने अभिषेकला भावना अनावर झाल्या होत्या. तो म्हणाला, “मी परीक्षेत नापास झालो असलो, तरी कुटुंबाने प्रोत्साहन दिलं. मी पुन्हा एकदा परीक्षा देईन, उत्तीर्ण होईन आणि आयुष्यात यशस्वी होईन”.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button